Tag Archives: मैत्रिणीने दिलेली शिक्षा

अधिकार

प्रिय वाचकांस,

माझ्या कथांना आपण आतापर्यंत भरभरुन प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
माझ्या निवडक कथा मी लवकरच अ‍ॅमेझॉन किंडल वर प्रकाशित करणार आहे.
“अधिकार” या कथेपासून मी याची सुरवात केली आहे. तरी रसिक वाचकांनी किंडलवर वा किंडल अनलिमिटेड वर या कथेचा आस्वाद घ्यावा ही विनंती.
खालील दुव्यांवर “अधिकार ” ही कथा उपलब्ध आहे
धन्यवाद

https://www.amazon.in/dp/B08WPB153F

https://www.amazon.com/dp/B08WPB153F


अधिकार

नीताची वाट बघत मी तिच्या फ्लॅटच्या बाहेर जिन्यात बसून होतो. मनात सतत तिचाच विचार होता. आज दहा दिवसानंतर आम्ही बोललो होतो. नीता माझ्यावर खूप रागावली होती आणि आता पुन्हा ती माझ्याशी कधी बोलेल या विचारांनी मी दहा दिवस अस्वस्थ होतो. अर्थात तिच्या रागावण्याला कारणही तसंच होतं.

आज आमच्या पदव्युत्तर कोर्सच्या पहिल्या वर्षाचा निकाल लागला होता. मी माझा निकाल घेतला पण नीता कॉलेजला आली नव्हती. कदाचित तिला माहितही नव्हतं की आज निकाल आहे. आणि निकालानंतर लगेच दोन दिवसातच दुसर्‍या वर्षाकरिता प्रवेश घेणं गरजेचं होतं. त्याकरिता अर्ज आणि शुल्क भरायचं होतं. मला वाटलं हीच चांगली संधी आहे नीताशी पुन्हा बोलायची. तिला मी कॉल लावला. पण अपेक्षेप्रमाणेच तिने माझा कॉल उचलला नाही. मग तिला मी मेसेज पाठवून निकालाबद्दल आणि प्रवेशाबद्दल कळवलं. त्यानंतर मी तिला पुन्हा कॉल लावला. ती फोन उचलेपर्यंत मनाची घालमेल वाढत होती. ती कशी बोलेल, ती इतकी रागावलेली असताना मी कसं बोलायला हवं.

तो संवाद पुन्हा एकदा आठवला

नीताने कॉल उचलला तरी ती प्रथम काहीच बोलली नाही, हॅलोदेखील नाही.

“हॅलो.. नीता”  मी कसाबसा बोललो.

“हं.. बोल.. का फोन केलायस ?” नीता अत्यंत रुक्षपणे म्हणाली.

“नीता, आज आपला रिजल्ट लागलाय. आणि सेकंड इयरची अ‍डमिशनपण घ्यायची आहे दोन दिवसात.”

“बरं..”

“तू कॉलेजला येणार आहेस का आज-उद्या ?”

“नाही”… तिला यायला जमणार नाही लगेच हे मला माहीत होतंच पण तिच्याकडून ऐकायचं होतं.

“बर मग तुझा रिजल्ट मी घेतलाय आणि अ‍ॅडमिशन फॉर्मपण घेतलाय तुझ्यासाठी. पण त्यावर तुझी सही लागेल”

“हं..”

“सहीकरिता भेटावं लागेल” मी कसंबसं म्हणालो.

“घरी ये तू”

“कधी ?”

“आजच ये. उदया माझी इव्हिनिंग आहे”

“किती वाजता येवू” असं मी विचारत असतानाच तिने फोन ठेवला.  नीताला माझ्याशी जास्त बोलायचं नव्हतं हे उघडच होतं.. पण आता तिला भेटायला मिळणार होतं आणि माझ्यासाठी ते जास्त महत्वाचं होतं. त्यामुळे तिला पुन्हा फोन न लावता मी तडक तिच्याघरी निघालो.

पण आता इथे आलो तर तिच्या घराला कुलूप होते. त्यामुळे मी तसाच तिची वाट बघत तिला आठवत बसलो होतो.

मी वर्गात पहिला आलो होतो. पण त्या आनंदापेक्षा नीता आज माझ्याशी पुन्हा बोलली, तिला आज भेटायला मिळणार हा आनंद मोठा वाटत होता. आज दहा दिवसांनी ती माझ्याशी बोलत होती… कदाचित ती माझ्यावर रागवेल, पण झाल्या प्रकारात चूक माझीच होती त्यामुळे ती बोलली तरी मी ऐकून घेईन. बाकी अनेकदा माझीच चिडचिड होइ आणि नीता शांतपणे समजून घ्यायची. नीता माझ्यापेक्षा सुमारे तीन वर्षांनी लहान. खरंतर आमच्या छोट्याशा वर्गात मी वयाने सर्वात मोठा होतो. तसंच मी इंजिनिअर, इतरांपेक्षा जास्त चांगला जॉब असलेला, या कोर्समध्येही अभ्यासात सगळ्यात पुढे, शिक्षकांवरही माझ्या अभ्यासूपणाचा विशेष प्रभाव असा असल्याने आमच्या वर्गात , ग्रुपमध्ये माझं स्थान काहीसं वरचं होतं.  काही महिन्यातच मी आणि नीता बरेच जवळ आलो होतो.  पण आमची केवळ मैत्री होती आणि नीताचा एक प्रियकर होता , जो या शहरात नसला तरी तिला भेटायला महिन्यातून एक दोनदा यायचा. त्यालाही आमच्या मैत्रीबद्दल माहित होतेच पण त्याची त्याबद्दल काही हरकत नव्हती. खरतर इतक्या दाट मैत्रीमुळे ग्रुपमध्ये सहज गैरसमज पसरला असता पण आमच्या ग्रुपमधले सगळेच समंजस होते आणि शिवाय ग्रुपमधलं माझं विशेष स्थान.. त्यामुळेही कुणी आमच्या मैत्रीबद्दल कधी वावगं बोलण्याची हिंमत केली नाही. आणि माझी सर्वात जवळची मैत्रीण असल्याने नीतालाही ग्रुपकडून आता विशेष महत्व मिळू लागले होते. तिची अर्थिक परिस्थिती पण बेताचीच होती त्यामुळे कधी तिला माझ्यकडून छोटी-मोठी मदत, पैसे उधार देणे वगैरे होत असे. कधी तिला कुठे जायचं असल्यास माझ्या बाइकवर तिला नेणं आणणं किंवा इतर काही मदत हवी असेल जसे तिच्या कॉम्प्युटरची लहानसहान दुरुस्ती ई मी करुन द्यायचो. नीताही नेहमीच माझा आदर करायची.. एकंदरीत आमच्या मैत्रीत माझं स्थान थोडंस वरचं होतं.

तिच्या घरी तिची ताई – भारती ताई आणि ती असे दोघेच होते. त्यांचे आई वडील नीता लहान असतानाच गेले होते. नीताला आधी नातेवाईकांनी आणि नंतर ताईने सांभाळलं होतं. ताई एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नर्सचा जॉब करायची. भारती ताई वयानं बरीच मोठी अगदी माझ्यपेक्षाही मोठी होती. तिच्या लग्नाचं ती जमवू पहात होती. पण तिला नेहमी नीताची काळजी असायची. तिला नीताच्या प्रियकराबद्दल माहीत नव्हते. पण माझी आणि नीताची घनिष्ठ मैत्री तिलाही चांगली वाटायची. मी नीताची काळजी घ्यायचो, काय हवं नको ते बघायचो यामुळे तिला बरं वाटायचं. तिला माझ्याबद्दल खूप विश्वास वाटायचा त्यामुळे ती नीताला सहजपणे माझ्याबरोबर कुठेही पाठवायला तयार व्हायची.

पण असं सगळं चांगलं असताना अलिकडे मीच कधी चिडचिड करु लागलो होतो. माझ्या मनासारखे न झाल्यास नीतावर वैतागायचो. ‘माझा फोन का नाही घेतलास ?, कॉलबॅक का नाही केलास? एस एम एस ला उत्तर का नाही दिलेस..” वगैरे.. खरंतर तिला नुकतीच कॉल सेंटरची नवीन नोकरी लागली होती. तिथे फोन वापरायची परवानगी नव्हती हे तिनं मला सांगितलं होतं. तसंच वेगवेगळ्या पाळीत असणारी नोकरी, घरातलं काही काम यामुळे तिची दमछाक व्हायची. माझ्याशी बोलायला , माझ्या मेसेजला उत्तर द्यायला कधी तिला जमायचं नाही. ती मला शांतपणे समजवून सांगायची  “अरे ऑफिसमध्ये होते “, किंवा “अरे खूप दमले होते रे” वगैरे.. आणि तिने असं गोड बोलून मला समजावलं की मलाही खूप छान वाटायचं आणि मी मनाशी ठरवायचो की आता पुन्हा नीतावर असं चिडायचं नाही. पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या.. कळतंय पण वळत नाही अशीच माझी स्थिती होती.

त्या दिवशी नीता तिच्या प्रियकराला भेटणार होती ते मला माहीत होतं. खरं तर ते दोघे सोबत असताना मी तिला कधीही कॉल करत नसे पण त्या दिवशी काहीतरी कारणाने मी तिला कॉल केला. तेव्हा “अनिल, मी तुला संध्याकाळी कॉल करते” असं म्हणत तिने फोन ठेवला. झालं..मी तिच्या कॉलची वाट पाहू लागलो. खरंतर ती हे म्हणाली तेव्हाच सायंकाळचे सहा वाजले होते. मग सात , आठ .. नऊ.. जसजसा वेळ जात होता तसतशी माझी अधिरता वाढत होती. खरंतर माझं तिच्याकडे इतकंही काही तातडीचं काम नव्हतं. पण “कॉल करते” असं ती म्हणाल्याने माझं मन वाट बघणं सोडत नव्हतं. अखेर दहा वाजता मी तिला पुन्हा कॉल केला. “नीता , तू मला कॉल करणार होतीस ना ?” माझ्या आवाजातला राग तिला नक्कीच जाणवला असेल. “अरे.. नाही जमलं. आणि मी आता दमलेय. आपण नंतर बोलू” ती संयमाने म्हणाली. “प्लीज आता बोल ना पाच मिनटं. तु म्हणाली होतीस ना बोलते म्हणून” तिच्या शब्दांवर बोट ठेवत मी हट्टीपणा चालू केला. तिचा मूड बहूधा आधीच थोडा खराब असावा त्यामुळे ती पण वैतागली. शब्दाला शब्द वाढू नये म्हणून असेल कदाचित पण तिने कॉल डिसकनेक्ट केला. मी दुखावला गेलो. मी तिला पुन्हा कॉल लावला. तिने तो रिजेक्ट केला. मग मी अजूनच दुखावलो. आणि तिला मेसेज पाठवला. पण तिने काही उत्तर दिले नाही. मी मेसेज पाठवत राहिलो. मी पुन्हा पुन्हा तिला कॉल करत होतो, ती रिजेक्ट करत होती. मी अजूनच दुखावला जात होतो. मी मेसेज पाठवत होतो. काहीत मी रागावत होतो तर काहीत ‘बोल ना गं पाच मिनटं तरी..” अशी तिची मनधरणी करत होतो. पण तिचं एकपण उत्तर मिळत नव्हतं. रात्र उलटू लागली पण झोप येईना. मी पुन्हा पुन्हा कॉल लावत होतो. अखेर कधीतरी तिने फोन बंद केला. मग कॉल जाणं बंद झालं मात्र मेसेजेस पाठवतच होतो. किती मेसेजेस त्याची गणतीच नाही. दुसर्‍या दिवशी मला वाटलं मी जरा अतिरेकच केला. मग तिची माफी मागण्यासाठी कॉल केला पण तिने तो घेतला नाही. पुढचे तीन चार दिवस रोज सकाळ -सायंकाळी तिला कॉल लावून बघत होतो पण तिने माझा एकही कॉल घेतला नाही.

लिफ्टपाशी हालचाल जाणवली आणि मी माझ्या विचारांच्या तंद्रीतून जागा झालो. नीता आणि भारतीताई लिफ्टमधून बाहेर पडत फ्लॅटच्या दारापाशी आल्यात. दोघी बहुधा कोणत्यातरी समारंभाला जावून आल्या असाव्यात. दोघींनी साडी नेसली होती आणि छानसा मेकअपही केला होता. नीता मरुन रंगाची साडी नेसली होती, तिने केस मोकळे सोडले होते. या वेळी ती खूप आकर्षक दिसत होती. रंगाने सावळी नीता खूप सुंदर नव्हती. पण बारीक अंगकाठी, लांबसडक केस, पाणीदार डोळे यामुळे ती नेहमीच लोभस दिसायची. दोघी दारातून आत जाताना मी पुढे आलो.

“नीता”

“हं अनिल .. ये” माझ्याकडे बघून पुन्हा लगेच समोर मान वळवत नीता म्हणाली. माझ्याकडे बघायचीही तिला जणू इच्छाच नव्हती.

आम्ही सगळे आत आलो. नीता आतल्या खोलीत गेली.

“काय अनिल काय म्हणतोस ?” भारती ताईने चौकशी केली.

“मी ठीक आहे ताई, आज रिझल्ट लागला ना. नीताचा रिझल्ट घेवून आलोय आणि अ‍ॅडमिशन फॉर्मवर तिची सहीपण घ्यायचीय”

“हं.. काय रिझल्ट लागला नीताचा ? पास झालीये ना ?” ताईने हसत विचारले

“नीताला फर्स्ट क्लास मिळालाय”

“अरे वा… आणि तुला रे”

“मला डिस्टींक्शन ..”

“वा वा.. फारच छान. अभिनंदन” ताईने माझा हात हातात घेत म्हंटलं. मला खूप बरं वाटलं.

“थँक्स ताई”

“बरं चलं माझी आज नाईट शिफ्ट आहे. मी आता आवरते आणि निघते”

“हो ताई” मी मान डोलावली.

ताई आत जायला निघाली पण मध्येच थांबली

“अनिल, तुझं आणि नीताचं काही भांडण झालंय का ? म्हणजे मला तसं जाणवलं तिच्या बोलण्यातून एक दोनदा”

“ताई.. नीता रागावलीये माझ्यावर.. खरंतर माझीच चूक होती. आणि आता दहा दिवस झाले ती माझ्याशी बोलत नाहीये” मी मान खाली घालून म्हणालो.

“अरे बोलेल रे.. तिचा राग लवकरच जातो. आणि आता घरी आला आहेस तर तिची समजूत काढ”

“हो.. समजूत काय. मी तिची माफीच मागणार आहे”

“ये हूई ना बात.. स्वतःची चूक मान्य करणं आणि त्यासाठी माफी मागणं याकरिता खूप समंजसपणा लागतो. तु ती तयारी दाखवली आहेस तर नीता तुला नक्की माफ करेल बघ. आणि जर ती काही बोलली , रागावली तरी ऐकून घे. मैत्रीत एखाद वेळेस माघार घेण्यात कमीपणा नसतो.”

“हो ताई. ती मला कितीही बोलली तरी मी तिला उलटून बोलणार नाही. ती दहा दिवस माझ्याशी बोलली नाहीये मला खूप त्रास होतो आहे, आज बोलली तर बरं वाटतंय. आता तिचा राग जाण्यासाठी मी काहीपण करु शकतो”

“खरंच शहाणा मुलगा आहेस तू.. चल मी आवरते आता” ताई निघून गेली.

दोन तीन मिनटांनी नीता बाहेर आली.

“पाणी घे..” माझ्यासमोर पाण्याचा ग्लास धरत नीता रुक्षपणे म्हणाली

मी बर्‍याच वेळेपासून पाणी पिलं नव्हत. नीताला अजून माझी काळजी वाटते आहे हे बघून जरा बरं वाटलं.  नीता आतल्या खोलीत जावून आली तरी तिने कपडे बदलले नव्हते. आणि साडीतल्या त्या आकर्षक रुपात ती माझ्यासमोर उभी होती. एरव्ही मीच तिला म्हंटलं असतं की ‘नीता सुंदर दिसते आहेस साडीत, आताच कपडे बदलू नकोस’ पण आता ते म्हणणं शक्य नव्हतं. कदाचित तिनंच माझ्या मनातले विचार जाणले असावेत.

मी नीताचा रिझल्ट आणि फॉर्म तिच्याकडे दिलेत.

“बाकी आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यांचा रिझल्ट काय लागला ?” नीताने तिचा रिझल्ट बघून झाल्यावर विचारलं

ओह.. माझा रिझल्ट न विचारता ग्रुप मधल्या सगळ्यांचा विचारला तर.. बर्र… मग मी पण माझा रिझल्ट न सांगता बाकी सगळ्यांचा सांगितला. नीताच्या चेहर्‍यावर काहीच भाव नव्हते.

“आणि तुझा काय ?” तिनं शांतपणे विचारलं.

अरे वा.. अखेर माझा रिझल्ट विचारला तर.

“मला डिस्टिंक्शन मिळालं”

“काँग्रॅट्स” नीता अगदी थंडपणे म्हणाली.

थँक्स म्हणत मी अभिनंदन स्वीकारण्यासाठी हात पुढे केला पण नीताने काहीच प्रतिसाद न दिल्याने मुकाट्याने मागे घेतला.

नीताने फॉर्मवर सही करुन फॉर्म माझ्याकडे दिला.

भारती ताई तयार होवून बाहेर आली आणि आम्हाला बाय म्हणत घराबाहेर बाहेर पडली

आता आम्ही दोघेच घरात होतो. नीता शांतपणे शुन्यात बघत सोफ्यात बसली होती. मी तिच्यासमोर खुर्चीत बसलो होतो. कुणीच काही बोलत नव्हते. मी इकडे तिकडे बघत अधूनमधून नीताकडे कटाक्ष टाकत होतो. पण ती माझ्याकडे अजिबातच बघत नव्हती. कदाचित माझ्याकडे साफ दुर्लक्ष करुन ती मला निघून जायला सुचवत होती. पण मी ते मनावर घेतलं नाही. माझी अस्वस्थता वाढत होती.

“नीता, माझ्यावरचा राग अजून गेला नाही का ?” त्या शांततेचा भंग करत मी विचारलं.

“अनिल मला तो विषय नकोय आता. आधीच मला खूप त्रास झालाय” नीता शांतपणाने तरीही ठामपणे बोलत होती.

“नीता.. मला माहितीये माझं चुकलंय, आय अ‍ॅम सॉरी. खरंच मनापासून सॉरी. पण सोड ना ते आता. प्लीज बोल ना माझ्याशी”

“अनिल मला जेव्हा वाटेल बोलावसं तेव्हा मी बोलेन. तू मला जबरदस्ती करु नकोस आणि मला उगाच सारखा फोनही करु नकोस”

“बरं नीता.. मी नाही करणार तुला आता कॉल. तुझ्या कॉलची वाट बघेन मी”

“ये तु आता…” नीता थंडपणे म्हणाली.

“जातो मी नीता, पण फक्त एक सांग की खरंच माझं इतकं जास्त चुकलं का गं ?”नीताने स्पष्टपणे मला असं जायला सांगितलं याचं मला वाईट वाटलं होतं. मी हळवा होवून तिला प्रश्न केला.

“हे बघ अनिल.. असं आहे की तु चुकतोस हे तुला मान्यच करायचं नसतं तर आता मी काय बोलू. म्हणूनच म्हंटलं जा तू आता.. बाय” नीता वैतागून म्हणाली.

“प्लीज नीता. मी अस नाही म्हणत की माझी चूक नव्हतीच. पण तु ही समजून घे ना. मी त्या दिवशी तुझ्या कॉलची वाट बघत होतो. पण तू कॉल केला नाहीस. तुझा काहीच चुकलं नाही का गं ?”

“तुला माहीत होत ना त्यावेळी मी कुणाबरोबर होते.. तरी तुझं काय उगाच ?”

“पण त्याला काही हरकत नाहीये ना आपल्या मैत्रीबद्दल”

“नाहीये.. पण म्हणून काय झालं. मुलगाच आहे ना तो. कधीही पजेसिव्ह होवू शकतो”

“बरं पण नंतर घरी आल्यावर तरी तु कॉल करुन निदान पाच मिनटं तरी बोलू शकत होतीस ना..” मी पुन्हा कधी हट्टीपणाने माझा मुद्दा रेटू लागलो ते माझं मलाच कळलं नाही.

“झालं पुन्हा तुझं तेच सुरु… अरे इतकं काय बोलायचं होतं तुला त्याच दिवशी माझ्याशी ..दुसर्‍या दिवशी मी काही मरणार नव्हते ना”  माझ्या हट्टीपणाबरोबर नीताचा पारा चढत होता. खरंतर आता मी थांबायला हवं होतं. पण ते कळण्याच्या मनस्थितीत मी नव्हतो.

“असं काही नाही नीता. पण मला एक सांग एक मित्र म्हणून मी तुला माझ्याशी फक्त पाच मिनटं बोलायचा आग्रह धरला तर माझा तितकाही अधिकार नाही का ?”

नीताने माझ्याकडे चमकून पाहिलं. माझा प्रश्न तिला अजिबातच आवडला नाही हे तिच्या चेहर्‍यावर स्पष्टच दिसत होतं. पण तरी संयम ठेवत ती काहीच बोलली नाही.

“बोल ना नीता माझा काहीच अधिकार नाही का ? मला उत्तर दे” मी अधिकच चिडून बोलत होतो. नीता उठून माझ्याजवळ आली.

तिनं  माझ्या प्रश्नाचं उत्तर अजून दिलं नव्हत आणि मी तिच्याकडे रोखून बघत होतो. एक दोन क्षण तसेच गेलेत.

=========================================

प्रिय वाचक,

नीताने अनिलच्या प्रश्नाचे काय आणि कशाप्रकारे उत्तर दिले ? नीता आणि अनिलच्या नात्यातील या वेगळ्या अधिकाराची संपुर्ण कथा वाचा फक्त आणि  फक्त अ‍ॅमेझॉन किंडलवर आणि तुमच्याकडे kindle unlimited चे subscription असेल तर ही कथा तुम्हाला पुर्णतः मोफत वाचता येईल. आणि kindle unlimited नसेल तरीही नाममात्र मुल्यात तुम्ही ही कथा kindle वर वाचू शकता.
त्याकरिता तुम्हाला खालीलपैकी एक लिंक क्लिक करायची आहे.
धन्यवाद

https://www.amazon.in/dp/B08WPB153F

https://www.amazon.com/dp/B08WPB153F

————————————————————————

प्रिय वाचक,
कृपया खालीलपैकी योग्य ती प्रश्नावली म्हणजेच सर्वे (survey)उघडून प्रश्नांची उत्तरे द्या.
घन्यवाद.

स्त्री-वाचकांकरिता-प्रश्नावली

पुरुष-वाचकांकरिता-प्रश्नावली

[संपर्क – samarpan.ek.premkatha@gmail.com]